। वावोशी। वार्ताहर ।
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त (दि.12) मे रोजी सुधागड मधील ढोकशेत येथील, समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी जग बदलणारा बापमाणूस या जगदीश ओहोळ यांच्या लिखित पुस्तकावर आधारित घेण्यात आलेल्या. भव्य लेखी स्पर्धेमध्ये आपल्या अभ्यासू शैलीने सचिन केदारे यांनी प्रथम क्रमांक पटकावत दहा हजारांचे रोख पारितोषिक मिळवले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त (दि.12) मे रोजी सुधागड मधील ढोकशेत येथील समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ या जगदीश ओहोळ यांच्या पुस्तकावर आधारित घेण्यात आलेल्या. भव्य लेखी स्पर्धेमध्ये सचिन केदारे यांनी सहभाग घेतला होता. सदरील परीक्षेचे आयोजन सुधागड तालुक्यातील परळी येथील डॉ. प्रभाकर गावंड हायस्कूल येथे सर्व जाती धर्मातील व सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी करण्यात आले होते. एकूण 50 गुण असलेल्या या लेखी परीक्षेचे स्वरूप पर्यायी प्रश्न पद्धतीचे होते आणि या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणार्या स्पर्धकाला 10 हजार, द्वितीय क्रमांक 7 हजार तर तृतीय क्रमांक 5 हजार असे उत्तेजनार्थ पारितोषिक ढोकशेत येथील, समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ठेवण्यात आले होते. या लेखी परीक्षेला संपूर्ण रायगड जिल्ह्यातून एकूण 100 स्पर्धक बसले होते. या 100 स्पर्धकामधून सचिन केदारे यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपल्या ज्ञानाची चमक या स्पर्धेतून दाखवली आहे. त्यामुळे त्यांचा ढोकशेत या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कार्यक्रमात आलेले प्रमुख पाहुणे प्रकाश देसाई यांच्या हस्ते रोख 10 हजार व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ स्वतः उपस्थित असल्याने या कार्यक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात साकार होताना दिसत होती. यावेळी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे सुधागड तालुका अध्यक्ष राहुल सोनावणे, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते पांडुरंग जाधव, वसंत केदारी, वंचित बहुजन आघाडीचे वैभव केदारी, समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.