| माथेरान | वार्ताहर |
मे महिन्यातील ऐन पर्यटन हंगामात माथेरान शहराचा वीज आणि पाणी पुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे येथील ग्रामस्थ आणि येणारे पर्यटक यांना भयंकर मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत शहरामधील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
मागील आठवड्यात अवकाळी पावसाने माथेरान शहरामध्ये चांगलीच धांदल उडवली. यामध्ये वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि त्यामुळे शहराचे कोलमडलेले पाणी नियोजन यामुळे सुप्रसिद्ध असे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान मधील ग्रामस्थांसह येथे आलेल्या पर्यटकांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागले. वीज आणि पाणी या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. यासाठी माथेरान शहरातील स्थानिक व्यापारी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चौधरी यांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी हॉटेल व्यवसायिक, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व सर्व ग्रामस्थांची एक विशेष बैठक श्रीराम चौक येथे आयोजित केली. सदर, बैठकीत रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वीज आणि पाणी यांच्या येथे वारंवार उद्भवणार्या समस्यांबाबत आणि इथल्या परिस्थिती बाबत निवेदन देण्याचे ठरवले. यामध्ये एमजेपी च्या पाणी पंपिंग स्टेशनवर जनरेटर बसविण्याची मागणी सर्वानुमते घेण्यात आली आहे.
सोमवारी (दि.20) मे रोजी माथेरान ग्रामस्थांच्या वतीने एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांच्या भेटीस जाऊन या बाबत निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांच्या कडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला, असून पाणी पंपिंग स्टेशन ठिकाणी लवकरच जनरेटरची सुविधा उपलब्ध केली, जाईल असे आश्वासन देण्यात आले. माथेरान मधील सर्व पक्षीय राजकीय मंडळींनी येथे एकत्रित येऊन हा प्रश्न मार्गी लावला. भविष्यात देखील वैयक्तिक राजकारण बाजूला ठेऊन माथेरान शहराच्या विकासासाठी व कोणत्याही महत्वाच्या मागणीसाठी अशीच एकजूट कायम ठेवली. तर माथेरानच्या अनेक समस्या मार्गी लागतील. माथेरान पर्यटनस्थळाला अजून नावलौकिक प्राप्त होईल. पर्यटनात वाढ होऊन अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे येथे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. माथेरान व्यापारी वेल्फेअर असोसिएशनचे खजिनदार चंद्रकांत जाधव यांनी गावच्या विकासासाठी अशाच प्रकारे आपण येथे एकत्र येऊन सहकार्य करावे. व्यापारी संघटना देखील गावच्या विकासाकरिता सदैव तत्पर आहे,असे यावेळी सांगितले.