। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील मध्य रेल्वे मार्गवरील शेलू गावाच्या हद्दीतील रेल्वे फाटक ते जुने ग्रामपंचायत कार्यालय या भागातील काँक्रीटीकरणाचे काम अनेक महिने बंद होते. मात्र, आता पावसाळा सुरु होण्याच्या स्थितीत असताना रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरु होत आहे.
शेलू ग्रामपंचायतमधील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम आठ वर्षांपूर्वी काम मंजूर झाले होते. त्यावेळी ठेकेदार कंपनीकडून रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरूच केलेच नाही आणि त्यामुळे हा महत्वाचा रस्ता तशाच अवस्थेत होता. त्यानंतर शेलू गावातील रहिवाश्यांची गैरसोय होत होती. त्यात शेलू रेल्वे स्थानक ते शेलू रेल्वे फाटक असा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निधीतून बनविण्यात येणार होता. मात्र, त्यावेळी केवळ अर्धाच रस्ता बनविला गेल्याने स्थानिक रहिवाशांना खोदलेल्या रस्त्यातून ये-जा करावी लागत होती. आता रखडलेल्या रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरु झाले आहे. या मार्गावर रस्त्यावरील माती काढून त्यावर खडीकरण करण्यात येत आहे. पावसाळ्यात या रस्त्याचे रखडलेले 300 मिटर लांबीचे काम करून घेण्यासाठी प्राधिकरणाकडून नियुक्त करण्यात आलेला ठेकेदाराकडून कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी सुस्काराला सोडला आहे.
काँक्रिट कामात चालढकल शेलू गावात सुरू असलेले बांधकाम हे नियम मोडून केले जात आहे. त्या ठिकाणी सध्या सुरू असलेले बांधकाम हे 12 इंच उंचीचा कॉक्रीट थर अशा पद्धतीचे असायला हवे होते. मात्र, त्या ठिकाणी चक्क सहा ते आठ इंच उंचीचा थर काँक्रिटीकरण करताना टाकण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी विचारणा केली असता अधिकारी कामावर येत नसल्याने ठेकेदार उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.