। वावोशी । वार्ताहर ।
खालापूरातील छत्तीशी विभागातील लोकप्रिय आणि सर्वांच्या परिचयाची विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, वावोशी या सरकारी मान्यता प्राप्त शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदाच्या इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेमध्ये विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे ही या शाळेतील पहिलीच दहावीची बॅच आहे आणि पहिल्याच बॅचमध्ये 100% निकाल हा दुग्ध- शर्करा योगच म्हणावा लागेल.
या विद्यार्थ्यांमध्ये कु.अंजली विनोद साहू हिला 81% गुण प्राप्त करून शाळेमध्ये पहिला येण्याचा मान मिळालेला आहे. अंजलीला अनुक्रमे इंग्रजी 82, हिंदी 71, मराठी 86, विज्ञान आणि तंत्रज्ञान 76, गणित 84 आणि सामाजिकशास्त्रे 78 असे गुण मिळाले आहेत. यापरीक्षेत अंजलीबरोबरच कु.दिक्षा राजू यादव, क.तनिष्का सचिन मार्तंडे, कु.आकांक्षा संतोष वर्मा आणि कु. गौरव प्रसाद मनवे या विद्यार्थ्यांनीही चांगल्या गुणांनी यश संपादन केले आहे. या कौतुकास्पद यशासाठी शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापिका सौ. मानसी पाटील मॅडम आणि त्यांच्या सहशिक्षिका यांच्यावर सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मात्र यशाचे सर्व श्रेय संस्था, संस्थेचे सर्व पदाधिकारी, दहावीला शिकवणारा शिक्षक वर्ग यांना देवून स्वतःचा मोठेपणा दाखवला आहे. त्याचबरोबर शिक्षकांवर विश्वास दाखवून मेहनतीने यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचे आणि पहिली दहावीची बॅच असूनही शाळेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पालकांचे देखील विशेष कौतुक केले आहे. विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल ही छत्तिशी विभागातील एकमेव मान्यता प्राप्त शाळा असून दहावीच्या पहिल्याच बॅचला बोर्डात घवघवीत यश मिळाल्यामुळे अगोदरच लोकप्रिय असलेली ही शाळा यशाचे शिखर गाठणार यात तीळभरही शंका नाही.