पुढील दोन महिने मासेमारीवर बंदी; किनार्यावर कोळी बांधवांची लगबग
। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतात मान्सूनचे आगमन झालं असून, तो केरळसह तामिळनाडूपर्यंत पोहोचला आहे. मान्सून दाखल झाल्याने मासेमारी हंगाम (दि.1) जून ते (दि.31) जुलै असा दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील मासळीचे लिलाव बंद होऊन कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनारी आणून शाकारण्यास सुुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अलिबागसह अनेक बंदरांवर बोटी नांगरुन ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये पाच हजारांहून अधिक मासेमारीच्या नौका आहेत. त्यामध्ये काही नौका यांत्रिकी, तर काही बिगर यांत्रिकी आहेत. (दि.31) मे हा मासेमारी हंगामचा शेवटचा दिवस होता. (दि.1) जूनपासून पुढील दोन महिने बोटी किनार्यावर असणार आहेत. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तब्बल दहा महिने मासेमारी व्यवसाय चालतो. मासेमारीतून मच्छिमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. अलिबाग, आक्षी, बोर्ली, रेवदंडा, नवगाव आदी बंदरांवर मासळीचा मोठ्या प्रमाणात लिलाव होतो. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. परंतु, अनेकवेळा बदलते हवामान, सांडपाण्यांमुळे समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण, जेली फिश अशा अनेक समस्यांमुळे मासेमारीवर परिणाम होतो. त्यामुळे मासळीच्या उत्पादनात घट होते. तरीदेखील जिल्ह्यातील मच्छिमार सर्व संकटांवर मात करीत मासेमारीचा व्यवसाय करीत आहेत.
जून महिन्यात पावसामुळे उधाणाबरोबरच वारा, वादळ मोठ्या प्रमाणात येते. मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अडकून पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. तसेच पावसाळ्यात मासळी प्रजोत्पादन कालावधी असतो. त्यामुळे दोन महिने मासेमारीवर शासनाकडून बंदी घातली जाते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणार्यांवर कारवाई केली जाणार आहे. मासेमारी बंदीमुळे मच्छिमारांनी नौका किनारी लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील काही बंदरांवर बोटी नांगरण्यात आल्या असून, काही ठिकाणी काम सुरू आहे.
म्हणून मासेमारीवर बंदी माशांच्या प्रजननासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून किनारपट्टी भागात दरवर्षी ही बंदी करण्यात येते. त्याचबरोबर पावसाळ्याचे दोन महिने समुद्रातील हवामान खराब असते. त्यामुळे बोटी समुद्रात नेण्यास मनाई करण्यात येते. 1 ऑगस्टनंतर नियमितप्रमाणे मासेमारीच्या नव्या हंगामाला प्रारंभ होतो.
मोठ्या होड्या एक महिना अगोदर उभ्या केल्या आहेत. लहान होड्या बंदर किनारी नांगरण्यास आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. सध्या बोटीवर प्लास्टिक आवरण टाकण्याचे काम सुरु आहे.
विजय गिदी, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य मच्छिममार संघ, मुंबई