। रोहा । वार्ताहर ।
शहरातील श्री सद्गुरू कृपा कृषी केंद्र या भात खरेदी केंद्रात बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याने शेतकर्यांनी सोमवारी (दि.10) हल्लाबोल करीत कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांच्या आदेशानुसार, संबंधित भात विक्री केंद्रावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
शहरातील श्री सद्गुरू कृपा कृषी केंद्रात विविध जातीचे भात बियाणे विक्रीसाठी आणले होते. अकोला जिल्ह्यातील महाबीज भवन कृष्णानगर येथील महाराष्ट्र शासन सिड्स कॉर्पोरेशन लिमिटेड या एजन्सीकडून तीन लाख 42 हजार रुपये किमतीचा 57 क्विंटल वजनाचा जया जातीचा भात असे प्रत्येकी 25 किलो वजनाच्या 240 बॅग खरेदी करून रोह्यात विक्रीसाठी आणल्या गेल्या. पेरणीसाठी शेतकर्यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या केंद्रावरून भाताची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. मात्र प्रत्यक्षात भाताच्या गोणीत जया जातीचा खराब भात आढळून आला. भाताच्या गोणीत माती व दगडाचे खडे, काळी कचरी, पळींज व तांदूळ असे खराब घटक आढळले. भाताच्या गोणी खरेदी केल्यानंतर पिंगळसई गावातील किसन देशमुख, भगवान शंकर देशमुख, जनार्दन दाजीबा देशमुख, जयवंत रामराव देशमुख, नंदकुमार भालेकर, सहदेव खेडेकर या शेतकर्यांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले. बियाणे बोगस असल्याचे लक्षात येताच शेतकर्यांमधून संताप व्यक्त होत आहे. सरकारने नेमलेल्या एजन्सीकडून शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे समजताच शेतकर्यांनी घडलेला सर्व प्रकार माजी सरपंच अनंता देशमुख यांना सांगितला. देशमुख यांनी सहकार्यासमवेत कृषी केंद्रात जाऊन श्री सद्गुरू कृपा कृषी केंद्र संचालक पी. जी. सुरणकर यांना धारेवर धरले. दरम्यान, मंगळवारी सकाळी तालुका कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार, मंडळ कृषी अधिकारी अमोल सुतार, कृषी सहायक प्रकाश राक्षिकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आतापर्यंत जया जातीचा आणलेला भात व विक्री केलेला भात, खरेदी केलेल्या शेतकर्यांची नावे घेऊन चौकशीसाठी भाताचे काही नमुने ताब्यात घेतले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.