। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात ई-रिक्षा स्थानिक हातरिक्षा चालक यांच्याकडून चालविण्यात येत आहेत. सोमवार दि.10 जूनपासून या ई-रिक्षा चालविल्या जात असताना माथेरान शहरात प्रवासी सेवा देत असताना काही तक्रारी अश्वपालकांना जाणवल्या आहेत. त्या तक्रारींवर माथेरान नगरपरिषदेने खुलासा करावा या मागणीसाठी माथेरान मधील अश्वपालक यांनी आपले घोडे बंद ठेवले होते. मात्र, माथेरान पालिकेने त्या बाबत ई-रिक्षा चालकांना आपली भूमिका मांडण्यासाठी बोलावले आहे. तसे अश्वपालक यांना कळविण्यात आले असल्याने ई-रिक्षा चालकांची चौकशी पूर्ण होईपर्यंत घोडे बंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
माथेरानमध्ये 11 जून रोजी काही ई-रिक्षा चालकांनी नियम मोडून प्रवासी वाहतूक केली होती. त्यामुळे 12 जुन रोजी माथेरान मधील स्थानिक अश्वपाल संघटना आणि मुलवासी अश्वपाल संघटना यांनी माथेरान नगरपरिषदेकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच, नियम डावलून ई-रिक्षा चालविल्या जात असल्याने अश्वपालक यांनी आपले घोडे बंद ठेवले होते. मात्र, नगरपरिषदेचे प्रशासक राहुल इंगळे यांनी हस्तक्षेप करून स्थानिक अश्वपाल संघटना यांच्या तक्रारी अर्जावर पत्र व्यवहार केला. त्यात तुमच्या सर्व मागण्या आणि तक्रारी यांच्यावर ई-रिक्षा चालकांची श्रमिक रिक्षा संघटना यांना खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, प्रकाश सुतार आणि सुनील शिंदे यांनी पालिकेत जाऊन आपण सर्व प्रश्न आणि मागण्यांवर लेखी खुलासा करू, असे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे पालिकेच्या पत्रानुसार अश्वपाल संघटनेनी घोडे बंद आंदोलन मागे घेतले आहे. तर, अश्वपाल संघटनेनी आपल्या तक्रारींचे निवेदन माथेरान पोलीस ठाणे यांना दिले आहे.







