| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात आरोग्यवर्धिनी रुग्णालयात ग्राम आरोग्य स्वच्छता आणि पोषण समुपदेशन सप्ताह साजरा केला जात आहे. त्या माध्यमातून तालुक्यातील वाकस येथील मंदिरात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वाकस गावातील गर्भवती महिला, स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचवेळी लसीकरण करण्यात आले असून, ग्रामस्थांचीदेखील आरोग्य तपासणी करण्यात आली.
वाकस येथील आयुष्मान आरोग्य मंदिर येथे ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण व समुपदेशन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्याम पावरा यांनी उपस्थितीत ग्रामस्थांना आरोग्यविषयक काळजी आणि जबाबदारी याबाबद्दल माहिती दिली. त्यावेळी डॉ. कृपाली सोनावळे यांनी महिलांच्या गर्भधारणा काळात घेण्याची काळजी तसेच आपल्या कुटुंबाची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी जागतिक पर्यावरण संरक्षण सप्ताहानिमित्त मान्यवरांना तुळशीची रोपं भेट म्हणून दिली.