रायगडमधून 40 एसटी बस फेऱ्यांचे नियोजन
| रायगड | प्रमोद जाधव |
दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून रायगड विभागाकडून यंदाही विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एसटी बस आगारांमधून प्रवाशांच्या सोयीसाठी 40 हून अधिक जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. अलिबाग, महाड, माणगाव, श्रीवर्धन, पेण, रोहा, मुरूड या आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गांसह स्थानिक स्तरावरही वाढीव फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.गर्दीचा हंगाम विचारात घेऊन अलिबाग-पनवेल विना थांबा बस सेवेवर अधिक भर दिला जाणार असल्याची एसटी महामंडळ रायगड विभागाकडून देण्यात आली आहे.
यंदा दिवाळीला सुरुवात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. शुक्रवारी(दि.6) धनत्रयोदशी, रविवारी(दि.8) नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन, मंगळवारी (दि.10) बलिप्रतिपदा आणि दिपावली पाडवा तसेच बुधवारी (दि.11) भाऊबीज हे सण असणार आहेत. दिवाळीसाठी लागणारे साहित्यांची दुकाने बाजारात सजली आहेत. नवनवीन कपडे, भांडी व अन्य साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. दिवाळीनिमित्त खरेदीवर अनेक ठिकाणी ऑफरही ठेवण्यात आली आहे. दिवाळी निमित्त शाळांनादेखील सुट्टी असणार आहे. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद गावी व नातेवाईकांसमवेत घालविण्यासाठी अनेकांनी तयारी केली आहे. दिवाळीची सुट्टी कधी जाहीर होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. दिवाळीत गावी जाणाऱ्या व नातेवाईकांकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, म्हणून एसटी महामंडळाने ज्यादा गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या गर्दीचा विचार करता, यावर्षी दिवाळी निमित्त जादा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळ रायगड विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील 8 आगारातून लांबपल्ल्यासह लोकल स्तरावर एसटी बसच्या 50 फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
रायगड जिल्ह्यात दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीनिमित्त 12 दिवस सुट्टीदेखील जाहीर झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातून बाहेर गावी जाणारे आणि बाहेर गावातून अलिबागसह जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. सुट्टी असल्याने पर्यटकांचादेखील ओघ वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांसह पर्यटकांना चांगली सेवा मिळावी, एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, म्हणून एसटी महामंडळ रायगड विभागाने दिवाळीसाठी अलिबाग महाड, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरूड माणगाव या आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जाणार आहेत. पेण आगारातून जामनेर, श्रीवर्धनमधून अक्कलकोट, रोहा, पाली, खोपोली येथून उमरगा, रोहामधून गोंदावले, मुरूडमधून अक्कलकोट, अलिबागमधून तुळजापूर, माणगावमधून शेगाव, माणगाव व महाडमधून पुणे, खुटीलमधून नालासोपारा, पोलादपूरमधून ठाणे, श्रीवर्धन व बोर्लीमधून बोरीवली एसटी बसेस पाठविल्या जाणार आहेत. महाडमधून पनवेल, अलिबागमधून पनवेल बसेसही सोडल्या जाणार आहेत. एसटीच्या 40हून अधिक फेऱ्या लांब पल्ल्यासह स्थानिक पातळीवर तालुक्याच्या ठिकाणी पाठविण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळ रायगड विभागाकडून देण्यात आली आहे.
दुसरीकडे, दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन-भत्ते, थकीत वार्षिक वेतनवाढ आणि 25 हजार रुपये दिवाळी भेट (बोनस) मिळावी या मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रवाशांना कोणताही खोळंबा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.






