| न्युयॉर्क | वृत्तसंस्था |
आधी नोकरी, मग खेळ असे समीकरण असलेल्या अमेरिका क्रिकेट संघातील खेळाडूंना या दोहोंमधील समन्वय साधावा लागत आहे. सध्या चर्चेत असलेला मराठमोळा सौरभ नेत्रावळकर याला तर सकाळी सामने आणि आणि नंतर ऑफिसचे काम म्हणजेच ‘वर्क फ्रॉम हॉटेल’ अशी कसरत करावी लागत आहे.
अमेरिकेतील ‘ऑरेकल’ या प्रसिद्ध कंपनीत नोकरी करत आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धा ही त्याच्यासाठी हौशेचा भाग आहे. अगोदर पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केल्यानंतर भारताविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना बाद करून सौरभ लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.आपल्या अमेरिका संघाची मजल साखळी सामन्यांपर्यंतच असेल. असे त्याच्यासह सर्वांनाच वाटत होते म्हणून सौरभने आपल्या कंपनीतून 15 जूनपर्यंतचीच सुट्टी घेतली, मात्र त्याचा संघ सुपर-आठ फेरीसाठी पात्र ठरत असल्यामुळे त्याला सुट्टी वाढवावी लागणार आहे. सुट्टीवर असला तरी त्याची कामापासून सुटका झालेली नाही. कंपनीचा लॅपटॉप तो सोबत बाळगत आहे. सामना संपल्यानंतर हॉटेलमध्ये परतल्यावर सौरभ ऑफिसचे काम करतो, अशी माहिती त्याच्या बहिणीने दिली आहे.