स्कॉटलंडची कांगारूंना कडवी झुंझ
। सेंट लुसिया । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकाच्या 35 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयासह इंग्लंडचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, स्कॉटलंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
सामन्यात प्रथम फलंदाज करताना स्कॉटलंड संघाची सुरुवात खुपच खराब झाली. अवघ्या 3 धावांच्या स्कोअरवर त्यांना पहिला धक्का बसला. सलामीवीर मायकेल जोन्स केवळ 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर जॉर्ज मुनसे आणि ब्रँडन मॅकमुलेन यांनी डावाची धुरा सांभाळली. या दोन्ही फलंदाजांनी दुसर्या विकेटसाठी 89 धावांची जबरदस्त भागीदारी केली. मुनसेने 23 चेंडूत 35 धावा केल्या आणि ब्रेंडन मॅकमुलेनने 34 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 60 धावांची तुफानी खेळी केली. स्कॉटलंडसाठी टी-20 विश्वचषकामध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रमही मॅकमुलेनच्या नावावर आहे. त्याने अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक झळकावले. यानंतर कर्णधार रिची बेरिंग्टनने 31 चेंडूत नाबाद 42 धावा करत स्कॉटलंडला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला लवकरच पहिला धक्का बसला. डेव्हिड वॉर्नर अवघी 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार मिचेल मार्शलाही केवळ 8 धावा करता आल्या. ग्लेन मॅक्सवेललाही केवळ 11 धावा करता आल्या आणि 60 धावांपर्यंत कांगारू संघाने 3 गडी गमावले होते. मात्र, यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्कस स्टॉइनिस यांनी झंझावाती भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन केले. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. ट्रॅव्हिस हेडने 49 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली. तर, मार्कस स्टॉइनिसने 29 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 59 धावांची खेळी केली. यानंतर टीम डेव्हिड आणि मॅथ्यू वेडने संघाला विजयापर्यंत नेले. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे स्कॉटलंड टी-20 विश्वचषकामधून बाहेर पडला असून इंग्लंड सुपर-8साठी पात्र ठरला आहे.