| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सर्व पब, बार-रेस्टॉरंटवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे. पब, बारमध्ये एआय प्रणालीचे सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. या सीसीटीव्हीमुळे गैरप्रकारावर आळा घालणे शक्य होणार आहे.
पुणे पोर्शे हिट ॲण्ड रन प्रकरणानंतर पुण्यासह राज्यभरात पब-बारमध्ये अल्पवयीन मुलांना सहज मद्य मिळत असल्याने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील सर्व पब, रेस्टॉरंट-बारवर नजर ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यामध्ये पब, रेस्टॉरंट-बारमध्ये ग्राहकांच्या वयाची संपूर्ण चौकशी करावी. तसेच, पब, रेस्टॉरंट-बारमधील वेळेच्या बंधनाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहे. विशेष म्हणजे, बार आणि पबमधील काऊंटरवर मद्य दिले जाते, त्या ठिकाणी किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केलेले आहे. तसेच, सीसीटीव्ही कॅमेरे एआय प्रणालीअंतर्गत असणे आवश्यक आहेत. सध्या शहरी भागात पब, रेस्टॉरंट-बार दीड वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात अकरा वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे; मात्र, अनेक बार आणि पब रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत सुरू असतात. त्याला या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आळा बसणार आहे. वेळमर्यादा पाळली गेली नाही तर, कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त सीसीटीव्हीमुळे विभागाला अलर्ट मिळणार आहे, त्यामुळे अशा पब-बारवर कारवाई करणे विभागाला सोपे जाणार आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वे ग्राहकांच्या वयाची शंभर टक्के चौकशी वेळेच्या बंधनाचे काटेकोर पालन सीसीटीव्ही कॅमेरा बसवा पबच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही आवश्यक बार काऊंटरवर एआय प्रणालीयुक्त किमान दोन सीसीटीव्ही हॉटेलच्या ओपन टेरेसवर मद्यविक्रीला बंदी फॅमिली बार- रेस्टॉरंटमध्ये मद्यपान करणाऱ्या ग्राहकाच्या वयाची चौकशी करा
सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी नियमावली एक महिन्यासाठी रेकॉर्डिंग साठवणे कॅमेरा इन्व्हर्टर सुविधेसह 24 तास कार्यरत असणे आवश्यक सीसीटीव्हीचा अक्सेस निरीक्षक, अधीक्षकांकडे असणार दोन मेगापिक्सेलचे रिझोल्यूशन इमेज डेटाच्या विश्लेषणासाठी एआय क्षमतेचे सॉफ्टवेअर
आयुक्त कार्यालयात सर्व्हर कनेक्ट प्रत्येक बार आणि पबच्या एआय प्रणालीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सर्व्हर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्षासोबत कनेक्ट असतील. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे व्हिडीओ फिड विभागाच्या नियंत्रण कक्षात बघता येणार आहे.