चर्चा मात्र शेकापच्या भाई मोहन गुंड यांची
| केज | प्रतिनिधी |
बीड लोकसभेचा निकाल लागला असून, बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विजयामध्ये जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, नेते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. खरं तर, ही निवडणूकच लोकांनीच हातात घेतली गेली होती, निवडणुकीत प्रत्येक माणसात वावरणारा माणूस महत्त्वाचा असतो. मात्र यात काही असे चेहरे होते, त्यांनी पडद्यामागे खूप काम केले. आमदार संदीप क्षीरसागर सोडले तर, महाविकास आघाडीत एकही दिग्गज नेता बजरंग सोनवणे यांच्यासोबत नसतानादेखील विजय मिळवता आला म्हणजे मराठा, मुस्लिम, बौद्ध समाजाची एकी भाजपवर नाराज असलेल्या सर्वच घटकातील लोकांनी विजय मिळवून दिला हे सत्य कोणाला नाकारता येणार नाही.
बीड जिल्ह्यामध्ये बजरंग सोनवणे यांच्या निवडणुकीत असाच एक चेहरा होता, एकाच पक्षात निष्ठेने 20 वर्षे काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे शेकापचे भाई मोहन गुंड. भाईंचे अनेक चळवळीतील लोकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध, शेतकर्यांच्या प्रश्नावर अनेक यशस्वी आंदोलनाचे रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. कापूस, ऊस, पीक विमा, पीक कर्ज, कर्जमाफी अशा अनेक प्रश्नांवर जिल्हाभरात खूप काम केले आहे. शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात तर जिल्ह्यातील बैलगाडी मोर्चाने जिल्ह्यात रान पेटवले. 2010 मध्ये राष्ट्रपतींच्या गाडीखाली ऊस बिलासाठी उडी घेईन म्हणून उमरीच्या विखे पाटील कारखान्याला 4 कोटी रुपये शेतकर्यांना द्यायला भाग पाडले. शंभू महादेव साखर कारखान्याचा लिलाव करून शेतकर्यांना जवळपास 10 कोटी रुपये मिळवून दिले. शेतकर्यांचा कुठलाही विषय असो, भाई गुंड रस्त्यावर काहीच राजकीय आधार नसलेला कार्यकर्ता मात्र लढताना अनेक वर्षे लोक बघत आहेत. शेतकरी कामगारांसाठी संघर्ष करणारा भाई मोहन गुंड हे मित्र पक्ष म्हणून भिंगरी लावून जिल्ह्यात फिरताना दिसले. प्रचारात सारीकाताई सोणवणे यांच्यासोबत भाईंची पत्नी शिवकन्या गुंड या पूर्ण निवडनुकीत परिवार म्हणून सोबत होत्या.
बीड जिल्हा हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. पूर्वी क्रांतीसिंह नाना पाटील, कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे, बबनराव ढाकणे हे डाव्या पक्षाचे खासदार राहिले. आज गढूळ राजकारण असलं तरी डावे पक्ष इथे तग धरुन आहेत. अनेक ग्रामपंचायतीत सत्ता आहे. अनेक वेळा पुरोगामी म्हणवून फक्त निवडणुकीपुरता वापर होतो म्हणून अनेकांची नाराजी होती. मात्र विचार ठाम असणारे डावे यावेळी प्रचारात आघाडीवर होते. यात कॉ. अजय बुरांडे, कॉम्रेड नामदेव चव्हाण, कॉ. भाऊराव प्रभाळे, दत्ता डाके, अॅड. भाई नारायण गोले, कॉ. मोहन जाधव असे अनेक रस्त्यावरचे चेहरे होते. बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी भाई मोहन गुंड यांनी स्वतः अहोरात्र जिल्ह्यातील गावागावात जाऊन संवाद साधत मोट बांधली. जिल्हाभरातील शेकापसह मित्रपक्षांची ताकद बजरंग बप्पाच्या पाठीशी उभी करण्यात भाई मोहन गुंड यशस्वी ठरले असल्याची चर्चा आहे. विजयाचे किंगमेकर खूप असले तरी ग्राऊंडवर मात्र भाई मोहन गुंड हा कार्यकर्ता जिल्हाभर बप्पाच्या कामी आला असल्याची चर्चा जिल्हाभरात आहे.
ही निवडणूकच खूप अटीतटीची ग्रामपंचायतीप्रमाणे झाली. भाजपवर समाजात रोष होता. शेतकरी विरोधी कायदे, मराठा आंदोलन, संविधान बदलण्याची भाषा, मुस्लिम विरोधी भूमिका, यामुळे महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी लोक आतुरलेले होते. जिल्ह्यात खूप स्वाभिमानी लोक आहेत, बप्पाच्या जवळ मोठे नेते नव्हते म्हणून माझ्यासारख्यावर लोकांत पोहोचणे ही जबाबदारी होती. शब्द दिलेल्या लोकांची आशा आम्ही भंग होऊ देणार नाहीत, जनतेच्या कामी येऊ.
भाई मोहन गुंड,
शेकाप नेते