| पनवेल | प्रतिनिधी |
ईडी आणि सीबीआयच्या चिखलात रुतलेली माणसे अंधारात साफ करण्याची कामे भाजप करीत आहेत. आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्राची वाताहात करणार्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार पदवीधरांना आहे. त्या अधिकाराचा त्यांनी या निवडणुकीत परिपूर्ण वापर करावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पनवेल येथील प्रचार सभेत त्यांनी भाजपा आणि मित्र पक्षांवर घणाघाती प्रहार केला. महाराष्ट्रात शेतकर्यांवर, तरुणांवर अत्याचार करणारे हे सरकार मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना ठेस पोहोचविणारे सरकार आहे, या सरकारच्या उमेदवारांना छत्रपतींचे मावळे बनून गाडून टाका, असेही पटोले यांनी सांगितले.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे कोकण विभाग मतदारसंघाचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पदवीधरांचा मेळावा पार पडला. यावेळी नाना पटोले बोलत होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शिवसेना उबाठा गटाचे उपनेते विजय कदम, किशोर जैन, आमदार हुस्नबानो खलिफे, आमदार नसीम शेख, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, शिरीष बुटाला, आर.सी. घरत, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, शेकाप पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक, मल्लिनाथ गायकवाड, अवचित राऊत यांच्यासह पनवेल तसेच महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी सांगितले की, ही निवडणूक ही रमेश किर यांची नाही तर सर्व पदवीधर तरुणांची निवडणूक आहे. कोरोनानंतर महाराष्ट्रात जे असंविधनिक सरकार आलं, तेव्हापासून राज्याचं वाटोळं झालं. आज महाराष्ट्रात पोलिसांच्या 17 हजार पदाच्या भरतीसाठी 17 लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. असे असले तरी भाजपच्या माध्यमातून होणार्या या भरतीमध्ये कधीही त्रुटी निर्माण करून भरती प्रक्रिया रद्ददेखील करण्याचे काम भाजपच्या माध्यमातून केलं जाऊ शकते. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका नागपूर, अमरावती याठिकाणी झाल्या. मात्र, नागपूर म्हणजे भाजप हे समीकरण असतानादेखील पदवीधर तरुणांनी मात्र यावेळी भाजपला धुवून टाकले. याठिकाणी सुशिक्षित मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय केला.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार तथा शिवसेना उपनेते विजय कदम यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिल्लीलादेखील दाखवून दिले आहे की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची धोरणे जनतेला कशी पटली आहेत. आता होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कोकण मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद दाखवून द्यायचीच आहे. कारण शिवसेनेने गेल्या वर्षीच 75 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे. आज संपूर्ण कोकण मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्षाचे एकूण मतदार नोंदणी ही जवळपास अडीच ते तीन लाखांच्या घरात असल्यामुळे रमेश कीर यांच्या विजयासाठी आपण नोंदणी केलेले मतदार हे मतदानापर्यंत पोहोचविणे, नंतर त्यांना घरापर्यंत सोडण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांची आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणून भाजपने तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न जैसे थे ठेवला आहे. हे अपयश नेमकं कोणाचं हाच प्रश्न उपस्थित होतोय. तसेच महाराष्ट्रातील तरुणांना आयपीएस, आयएएस अधिकारी हे कसे लवकर होता येईल यासाठी रमेश कीर हे प्रयत्न करतील, असा विश्वास देखील विजय कदम यांनी व्यक्त केला.
आघाडीचे वर्चस्व दाखवून द्या आ. जयंत पाटील यांचे आवाहन कोकण पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे वर्चस्व दाखवून द्या, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले की, रमेश कीर यांच्यासाठी मतदारांची नोंदणी केलेली मते ही 26 तारखेला कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी आपली आहे. आज वातावरण आपल्या बाजूने आहे, देशात इंडिया आघाडी तर राज्यात महाविकास आघाडी भक्कम आहे. त्यामुळे येत्या पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे वर्चस्व दाखवून द्यायचं आहे. रमेश कीर यांनी शिक्षकांचे, पदवीधर तरुणांचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर द्या. कारण, इतर प्रश्न मार्गी लावण्याचे काम आम्ही करीत आहोत. आज एकच सांगतो, मला देशाचे पंतप्रधान म्हणून राहुल गांधीना बघायचे आहे. जी लोकं पाच वर्षांपूर्वी राहुल गांधी यांना पप्पू बोलायचे, त्याच राहुल गांधींनी या सगळ्यांना पप्पू बनवून टाकले. त्यामुळे जे वारे आपल्या बाजूने वाहात आहेत, ते टिकवून त्या वार्याचे वादळात रूपांतर करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, असे आवाहनदेखील जयंत पाटील यांनी पदाधिकार्यांना केले.