| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यावर प्राचीन भुयार आढळली आहे. गडकिल्ल्यांचे अभ्यासक व सह्याद्री प्रतिष्ठान सदस्य गणेश रघुवीर व सह्याद्री प्रतिष्ठान पनवेलचे सदस्य मयूर टकले यांच्या पाहणीत हे भुयार आढळले. याबाबतची माहिती गणेश रघुवीर यांनी वन विभाग व पुरातत्व विभागाला दिली आहे. यापूर्वी किल्ल्यावर दोन भुयार आहेत. या भुयारांचा वापर पूर्वी वाटसरू थांबण्यासाठी किंवा ध्यानधारणेसाठी करत असल्याचा अंदाज दुर्ग अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
कर्नाळा किल्ल्याचे संरक्षण व जतनासाठी वन विभागाने इतिहास अभ्यासकांची एक समिती स्थापन केली आहे. गणेश रघुवीर हे त्याच समितीचे एक सदस्य आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये गणेश यांच्या अभ्यासगटाने कर्नाळा किल्ल्यावरील निसरड्या वाटा, किल्ल्याचा कोणता भाग ढासळतोय, त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचा विस्तृत अहवाल बनवून दिला होता. त्यानंतर वन विभागाला निधी मिळाल्यानंतर वन विभागाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी गणेश रघुवीर व मयूर टकले यांना किल्ल्यावर नवे भुयार आढळले. हे भुयार पूर्वीच्या दुसर्या क्रमांकाच्या भुयारापुढे 80 फुटांवर कातळाच्या कडेला आढळले. हे भुयार 80 टक्के मातीने बुजले असून, याचे तोंड अडीच फूट लांब व दीड फूट रुंदीचे आहे. भुयाराची आतील बाजू सुमारे 10 फूट एवढी आहे. मातीचा गाळ काढल्यानंतर त्याची प्रत्यक्षात मोजमाप काढता येईल, असे गणेश रघुवीर म्हणाले.
किल्ल्याच्या घेर्यात असलेल्या पायथ्याजवळील कल्हे गावातून अर्धा तास उंचीवरील कड्यात एक कोरीव भुयार आहे, तर किल्ल्यावर एल आकारची दोन कोरीव भुयारे आहेत. त्यांना स्थानिक पाण्याची टाके असे म्हणतात. परंतु, ही पाण्याची टाके नसून, ही भुयार वाटसरुंना विसावा किंवा ध्यानधारणांची ठिकाणे असल्याचे रघुवीर यांनी स्पष्ट केले. भुयार क्रमांक 1 पहिल्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला एक पायवाट जाते त्याने दोन मिनिटे चालत गेले असता कातळात खोदलेले कोरीव भुयार दिसते. हे एल आकाराचे आहे. याचे तोंड 3द3 एवढे असून, 6 फूट खोल व तळाशी 3द3 आकारचे तोंड असून, ते 10 फुट लांबीचे कोरलेले आहे. भुयार क्रमांक 2 किल्ल्यावरील कर्णाई देवी मंदिरासमोर पत्राच्या शेडच्या उजव्या बाजूला एक मोठा घराच्या जोत्याचा चौथरा आहे. त्यावरून डाव्या बाजूने कडे कडेने गेले असता तेथे कातळात खोदलेले एक भुयार आहे. स्थानिक लोक त्याला पाण्याची टाकी संबोधतात पण ती पाण्याची टाकी नसून ते एल आकाराचे भुयार आहे. त्याचे तोंड हे 2.5 द2.5 आकाराचा चौकोनी भाग असून हा साधारण 6.3 फुट एवढा खोल असून त्याच्या तळाशी 2 द2 फुट आकाराचा चोकोनी भाग कोरला असून आत 8 ते 10 फुट लांब एवढा कोरीव भाग आहे. या किल्ल्यावर सातवाहन, पोर्तुगीज, गुजरात सुलतान, देवगिरी यादव, आदिलशहा, निजामशहा, मराठे आणि इंग्रज या राजवटी इथे होऊन गेल्याचे अनेक संदर्भ येथे मिळतात.आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तवसुद्धा या किल्ल्यावर होते.







