| पनवेल | प्रतिनिधी |
अतिरेकी मनी लाँडरिंग, कारवाईमध्ये सहभाग असल्याची भीती घालून एक सायबर टोळीने खारघरमधील दाम्पत्याला डिजिटल अटकेच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून तब्बल 35 लाख 55 हजार रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर टोळीने या दाम्पत्याला सलग 15 दिवस दहशतीखाली ठेवून ही लूट केल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीचा खारघर पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणात लुटले गेलेले सेवानिवृत्त दाम्पत्य खारघर सेक्टर 3 परिसरात राहण्यास असून, 25 मार्च रोजी सायबर टोळीने या दाम्पत्यातील महिलेला आयटी विशाल या नावाने संपर्क साधला होता. त्यानंतर त्याने आपण डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे भासवून, त्यांच्या नावाने घेतलेल्या एका मोबाइल क्रमांकामुळे कुलाबा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात सलग 15 दिवस दहशतीखाली ठेवले गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश घातलेल्या आरोपीने या महिलेला व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करून त्यांना डिजिटल अरेस्ट केले. सायबर टोळीने या महिलेला व त्यांच्या पतीला दर तीन तासांनी वुई आर सेफ असा मेसेज पाठवण्यास भाग पाडले. तसेच, ही माहिती कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली. त्यानंतर सायबर टोळीने या दाम्पत्याच्या बँक खात्यातील रक्कम आरबीआय आणि एफआययूकडून तपासणी करून परत करण्याचा बहाणा केला. अशा पद्धतीने 26 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीत या दाम्पत्याने गुगल पे आणि आरटीजीएसद्वारे एकूण 6 व्यवहार करून एकूण 35 लाख 55 हजार रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले.







