नेरळमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणामाची शक्यता
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मोहाची वाडी येथील मुख्य जलकुंभाला तडे गेल्याने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. सुमारे चार लाख लिटर क्षमतेच्या या जलकुंभामध्ये गळती सुरू झाल्याने त्यातील पाणी साठवण तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
1999 पासून कार्यरत असलेली ही नळपाणी योजना साडेसहा कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आली होती. या योजनेमुळे नेरळ गावातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत होता. मोहाची वाडी आणि बोर्ले येथील जलकुंभांमधून पाणी वितरण केले जात होते. मात्र, मुख्य जलकुंभ निकामी ठरल्याने आता गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, ग्रामपंचायतीकडून पर्यायी उपाययोजना म्हणून गावातील इतर लहान साठवण टाक्यांमधून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांना स्थानिकांकडून जलकुंभातील तड्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. सुरक्षेच्या दृष्टीने जलकुंभाजवळील रहिवाशांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
उन्हाळ्यात पाण्याची गरज वाढत असल्याने गावातील सर्व भागांना वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करण्याचे निर्देश ग्रामपंचायतीला दिले आहेत. प्रत्येक भागाला किमान एक वेळ तरी पुरेसे पाणी मिळावे यासाठी नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे.
भगवान चंचे,
सदस्य, पंचायत समिती
पाण्याच्या टाकीला तडे गेल्याची माहिती मिळताच आम्ही तातडीने पाहणी केली. कोणताही अपघात होऊ नये म्हणून जलसाठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील सर्वांना पाणी मिळेल यासाठी प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.
सुनीता मोरे,
सदस्या, जिल्हा परिषद







