| मुंबई | वृत्तसंस्था |
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. सतत पाऊस पडत असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. ठिकठिकाणी ट्रॅक जवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहेत.
मुंबईसह उपनगरात आणि कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस चालू आहे. अशातच सतत पाऊस पडत असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. मुसळधार पावसामुळे डोंबिवली ते कल्याण दरम्यान सिग्नल मिळत नसल्याने मध्य रेल्वे उशिराने धावत असल्याचे सांगितले जात आहे. या कारणानेच अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.
यामुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. तर पालघर भागातही सकाळपासून जोरदार पाऊस होत असल्याने त्याचा फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. डहाणू विरार लोकल सेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. ठिकठिकाणी ट्रॅक जवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहेत. यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.