| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील चोरढे ग्रामपंचायत अंतर्गत सावरोली येथील प्रभात पतसंस्थेमार्फत रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वह्या, इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार वह्यांचे वाटप करण्यात आले. असे एकूण शाळेतील 98 विद्यार्थ्यांना 32 डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, प्रभात पतसंस्थेकडून चोरढेसह चणेरा, धोंडखार, तळेखार, वाघुळवाडी व शिरगाव येथील विद्यार्थ्यांना जवळपास 88 डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. वह्यावाटप करण्यासाठी नितीन डाके, ॲड. सचिन पाटील, सुरेश पाटील, दीपक गीते, गोविंद शिंगरे, अनिल पाटील, यश केमसे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभात पतसंस्थेसारखी पतसंस्था सामाजिक जाणिवेतून गरजू विद्यार्थ्यांसाठी नेहमी धावून येतात हे निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे, असे मत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व्यक्त केले.