। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या नाकर्तेपणामुळे उमटे धरण गेल्या सहा महिन्यांपासून वादाच्या भोवर्यात सापडत आहे. धरणातील गाळाच्या प्रश्नाबरोबरच आता धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाचा प्रश्न समोर आला आहे. जीर्ण झालेल्या भिंतीमुळे आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन तातडीने कामाला लागले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी शुक्रवारी धरणाची पाहणी करून जिल्हा परिषद सेस फंडातून धरणाची डागडुजी करण्याचे निर्देश संबंधित विभागातील अधिकार्यांना दिले.
उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995 साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरीत झाले. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर, धरणाची उंची 56.40 मीटर आहे. धरणाच्या पाण्यावर 47 गावे व 33 आदिवासीवाड्या अवलंबून आहेत.
उमटे धरणात गाळ साचल्याने पाणीटंचाईची समस्या दरवर्षी निर्माण होत आहे. 40 हजारांहून अधिक नागरिकांसमोर पाणी कपातीचे संकट उभे राहात आहे. या गाळाच्या प्रश्नाबाबत उमटे धरण संघर्ष समितीचे प्रमुख अॅड. राकेश पाटील व त्यांच्या टीम आवाज उठविला. त्यांना अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पाठिंबा देत स्वखर्चाने गाळ काढण्याची तयारी दाखविली. त्यामुळे या धरणातील काही भागातील गाळ काढण्यास यश आले. शासनाच्या एक पाऊल पुढे जात सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात त्यांनी दिला.
41 वर्षे जुन्या असलेल्या धरणातील दुरुस्तीकडे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम धरणाची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या बाह्य बाजूकडील भिंतीचे दगड मोठ्या संख्येने निखळले आहेत. त्यामुळे तेथील भिंतीला भले मोठे भगदाड पडले आहे. ही समस्या निर्माण झाली असतानादेखील पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या विभागाच्या कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहे. उमटे धरणातील भिंतीला पडलेल्या भगदाडाची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना मिळाली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शुक्रवारी (दि.21) उमटे धरणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी धरण मजबुतीकरणासाठी परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. तसेच या पाहणी दौर्यात उमटे धरणाच्या भिंतीला पडलेले भगदाडाची तातडीने डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या. डागडुजीसाठी आवश्यक निधी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कदम, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुधीर वेगुर्लेकर, प्रल्हाद बिराजदार, निहाल चवरकर उपस्थित होते.
उमटे धरणाकडील रस्ता खडतर उमटे धरणाकडे जाण्याच्या मार्गाची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषद अपयशी ठरले. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. उमटे धरणाकडे जाणार्या सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. लहान-मोठे खड्डे व दगड या रस्त्यावर आहेत. उमटे धरणाकडे जाणार्या रस्त्यासाठी शासनाकडून एक कोटी 93 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अजूनपर्यंत या रस्त्याचे काम सुरु केले नाही. त्याचा फटका या मार्गावरील प्रवाशांसह नागरिकांना बसत आहे. रस्ता मंजूर असूनही रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्याची अवस्था संबंधित ठेकेदार व प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी सरपंच मधुकर ढेबे यांच्यासह अनंता पाचांगे व ग्रामस्थांनी केली आहे.