| डॉर्टमंड | वृत्तसंस्था |
माजी विजेत्या पोर्तुगालने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ‘फ’ गटातून बाद फेरी निश्चित केली आहे. त्यांनी तुर्कस्तानवर 3-0 फरकाने सफाईदार विजय मिळविला. प्रतिस्पर्ध्यांच्या विस्कळित खेळाचा ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील संघाला फायदा झाला. पोर्तुगालचा संघ नवव्यांदा बाद फेरीत पोहोचला आहे.
अगोदरच्या लढतीत चेक प्रजासत्ताकावर निसटती मात केलेल्या पोर्तुगालने प्रारंभापासूनच वर्चस्व राखत ‘फ’ गटातील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांचे एकूण सहा गुण झाले आहेत. पहिल्या लढतीत जॉर्जियाला नमविलेल्या तुर्कस्तानचे आता तीन गुण कायम असून अखेरचा साखळी सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. चेक प्रजासत्ताक व जॉर्जियाचा प्रत्येकी एक गुण आहे. अखेरच्या फेरीत पोर्तुगाल जॉर्जियाविरुद्ध खेळेल, तर चेक प्रजासत्ताकविरुद्ध तुर्कस्तानची लढत होईल.
सामन्याचा मानकरी ठरलेल्या बर्नार्डो सिल्वा याने डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर पोर्तुगालला 21 व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. नंतर 28 व्या मिनिटास गोलरक्षक अल्ताय बायिन्दिर व बचावपटू समेत अकायदिन यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका तुर्कस्तानला बसला. अकायदिन याच्या स्वयंगोलमुळे पोर्तुगालच्या खाती आणखी एक गोल जमा झाला. 56 व्या मिनिटास 39 वर्षीय रोनाल्डोच्या निःस्वार्थी साह्यावर ब्रुनो फर्नांडिसने पोर्तुगालला बाद फेरीत नेणारा गोल केला. रोनाल्डोने आता युरो करंडक इतिहासात आठ असिस्टची नोंद केली आहे. त्यांच्या बचावफळीत पुन्हा एकदा 41 वर्षे व 117 दिवसांचे पेप उल्लेखनीय ठरला.