| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अवमान खटला चालवण्यात येणार आहे. या प्रकरणी नागपूर खंडपीठाने दिलीप वळसे पाटील यांना सहा आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही एका सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे हे आदेश दिलेत.
महाराष्ट्र सहकार सोसायटी कायद्याच्या अंतर्गत याचिकातर्ता हरिभाऊ मोहोड यांनी सहकारिता विभागाकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर अनेक महिने सुनावणी न झाल्याने मोहोड यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. 19 जानेवारी 2024 रोजी न्यायालयाने सुनावणीसाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना चार आठवड्याचा कालावधी दिला होता. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2024 रोजी देखील न्यायालयाने अशाच प्रकारचा आदेश दिला. न्यायालयाने दोन आदेश दिल्यानंतरही मोहोड यांच्या अपिलावर सुनावणी झाली नाही. यानंतर 19 जून रोजी सहकारमंत्री आणि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यावर अवमान खटला दाखल केला आहे. याप्रकरणी सहा आठवड्यांच्या कालावधीत न्यायालयात जबाब सादर करायचा आहे.