। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांचा रविवारी (दि. 7) वाढदिवस आहे. मात्र, शेकापच्या नेत्या माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे रविवारी होणारा अभिष्टचिंतन सोहळा रद्द करण्यात आला असून, ते कोणाची भेट घेऊ शकणार नसल्याचे शेकाप कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
दरवर्षी आ. जयंत पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यानिमित्त जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी विविध उपक्रम राबविले जातात. रायगड जिल्ह्यासह राज्यातील राजकीय, व्यावसायिक अशा अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींसह पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित राहून आ. जयंत पाटील यांना शुभेच्छा देतात.
मात्र, शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांच्या निधनामुळे आ. जयंत पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आ. जयंत पाटील या दिवशी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नसतील, असे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.