एमएसआयडीसीच्या कामांचा बेजबाबदारपणा उघड
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील रस्त्यांची कामे नागरिकांच्या जिवावर उठली आहेत. आरांश आणि प्रकाश भगत यांच्या मृत्यूने कामांमधील असुरक्षितता समोर आली आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार आणि सुट्टीच्या दिवशी रस्त्यांची कामे बंद ठेवावीत, अशी मागणी जोर धरत आहे. जिल्हा प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून निर्णय घेण्याचे अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अलिबाग, नागाव आणि मुरुड परिसरात शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मुंबई, पुण्यासह विविध भागांतून पर्यटक समुद्रकिनाऱ्यांकडे येतात. अशा वेळी रस्त्यांचे खोदकाम, मातीचे ढिगारे आणि एकेरी वाहतुकीमुळे प्रचंड कोंडी होण्याची शक्यता आहे. याचा फटका स्थानिक नागरिकांसह पर्यटक आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना बसू शकतो.
पुढील महिन्यात वर्षअखेरीच्या पार्श्वभूमीवर नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे एमएसआयडीसीने शनिवार-रविवार कामे बंद ठेवून इतर दिवशी नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे. आरांशचा मृत्यू वाहतूक कोंडीत झाला, तर प्रकाश भगत यांचा जीव रस्त्याच्या कामातील असुरक्षिततेमुळे गेला. या घटनांनंतरही प्रशासनाला जाग येणार नसेल, तर आणखी किती बळींची प्रतीक्षा आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी एमएसआयडीसी, ठेकेदार आणि पोलीस प्रशासनाची तातडीने बैठक घेऊन कामांचे वेळापत्रक निश्चित करावे. धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स, सूचना फलक आणि प्रकाशव्यवस्था करावी. विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या जिवाशी खेळ थांबवावा, अशी मागणी होत आहे.
रुपेश पाटील,
आरांश आणि प्रकाश भगत यांच्या मृत्यूने रस्ते कामांमधील असुरक्षितता स्पष्ट झाली आहे. शनिवार-रविवारी आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये अलिबाग, नागाव आणि मुरुडमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. वर्षअखेरीस ती आणखी वाढणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी रस्त्यांची कामे बंद ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने वेळीच निर्णय घेऊन नागरिकांचे जीव वाचवावेत.
बेलकडे ग्रामस्थ






