| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा परिसरातील वडगाव जिल्हा परिषद शाळेला आठवीच्या वर्गाला मान्यता देण्यात आली असुन शाळा आणि शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियमानुसार तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जेत वाढ करण्याकरिता व माध्यमिक वर्ग जोडण्यास सक्षम प्राधिकरण अधिकारी म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खालापूर तालुक्यातील वडगाव येथील राजिपच्या प्राथमिक शाळेला दर्जा वाढ आणि माध्यमिक वर्ग म्हणजे इयत्ता आठवीच्या वर्ग वाढीस मान्यता दिली आहे.
प्राथमिक शाळेचा पट वाढविण्यासाठी मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक आणि शाळा कमिटी यांनी प्रयत्न केला असून हि पट वाढ शेकड्यात झाली आहे. विद्यार्थी पट वाढ होण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जाणाऱ्या अनेक मुलांनी शाळेची गुणवत्ता, प्रगती, शिक्षणाचा दर्जा, इंग्लिश शिकविणे आणि शिक्षकांची मेहनतीवर विश्वास ठेवून सुमारे 26 विद्यार्थ्यांनी पुन्हा वडगांव शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेत आधुनिक तंत्रज्ञान व संगणकीय प्रणाली उपलब्ध आहे. पालकांशी हितगुज, संवाद या बरोबर बैठक देखील होत असतात.







