खारघर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
| पनवेल | वार्ताहर |
एक लाख, 50 रुपयांचे 82 चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. खारघर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमांत संबंधित मोबाईल परत करण्यात आले. आणखी 800 मोबाईल ट्रेस करण्यात आले असून, लवकरच मोबाईल हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कामगिरीचे वरिष्ठांकडून खारघर पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे.
2023 ते 2024 दरम्यान खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे मोबाईल चोरी, तर काहींचे मोबाईल गहाळ झाले होते. याप्रकरणी मोबाईल चोरीसह हरविल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे उप निरीक्षक ज्ञानोबा धुळगंडे, फिरोज आगा, वाजिद शेख, सचिन डावरे, मोरे असे अन्य पोलीस पथकाने मुंबईसह इतर राज्यांतून चोरीसह गहाळ झालेले 13 लाख 50 हजार रुपयांचे 82 मोबाईल हस्तगत केले होते. संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून परत करण्यात आले. यावेळी या मालकांनी खारघर पोलिसांचे आभार व्यक्त केले. इतर 800 मोबाईलची माहिती काढण्यात पोलिसांना यश आले असून, लवकरच ते मोबाईल हस्तगत करुन त्यांच्या मालकांना परत करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी यावेळी सांगितले.