। बेळगाव । प्रतिनिधी ।
बेळगावात गोकाक तालुक्यात स्कूल बसचे स्टेअरींग लॉक झाल्याने बस उलटली. या अपघातात सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत, तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मेलमट्टी, गोडचीनमलकी आणि मावनूर या गावातील विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस मरडीमठ गावाकडे निघाली होती. गोकाक पाच्छापूर मार्गावरील मेलीमर्डी क्रॉस येथे बसचे स्टेरिंग लॉक झाले आणि बस उलटली. त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांनी घाबरून आरडाओरड केली. मुलांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले. हा अपघात सकाळी दहाच्या सुमारास घडला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.







