। कोलंबो । वृत्तसंस्था ।
गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात आणि सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने श्रीलंका दौर्याची सुरुवात विजयाने केली आहे. भारताने टी 20 मालिकेतील पहिला सामना हा 43 धावांनी जिंकला आहे. भारताने श्रीलंकेला विजयासाठी 214 धावांचे आव्हान दिले होेते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामी जोडीने शानदार भागीदारी करत टीम इंडियाला घाम फोडला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाने मुसंडी मारली. त्यामुळे श्रीलंकेला नीट 20 षटकेही खेळता आली नाहीत. टीम इंडियाने श्रीलंकेला 19.2 ओव्हरमध्ये 170 धावांवर रोखले.
टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली आहे. पाथुम निसांका आणि कुसल मेंडीस या सलामी जोडीने 84 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कुसल मेंडीस 45 धावांवर बाद झाला. मेंडीसने 27 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटकारासह 45 धावा केल्या. त्यानंतर पाथुम निसांका आणि कुसल परेराने दुसर्या गड्यासाठी 56 धावा जोडल्या. पाथुमने 48 बॉलमध्ये 7 फोर आणि 4 षटकारांसह 79 धावा केल्या. इथून टीम इंडियाने कमबॅक केले. कुसल परेरा 20 आणि कामिंदु मेंडीस याने 12 धावा जोडल्या. दोघे आऊट झाल्यानंतर श्रीलंकेची 4 बाद 158 अशी स्थिती झाली. त्यानंतर टीम इंडियाने 6 गडी अवघ्या 12 धावांच्या मोबदल्यात घेत श्रीलंकेला 19.2 ओव्हरमध्ये 170 रन्सवर गुंडाळले. टीम इंडियाकडून रियान पराग याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग अक्षर पटेल या दोघांनी 2-2 विकेट्स काढल्या. तर मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट आली. दरम्यान त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाठवल. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 213 धावा केल्या.
टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या चौघांनी सर्वाधिक धावा केल्या. सूर्याने सर्वाधिक 58 रन्स केल्या. ऋषभ पंतने 49 धावांचे योगदान दिले. तर यशस्वी जयस्वाल-शुबमन गिल या दोघांनी अनुक्रमे 40 आणि 34 रन्स केल्या. हार्दिक पंड्याने 9 धावा केल्या. तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह ही जोडी अनुक्रमे 10 आणि 1 धाव करुन नाबाद परतले. श्रीलंकेकडून मथीशा पथीराणा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.







