। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी ई-रिक्षा चालविण्यात येतात. अशा एका ई-रिक्षामधून विद्यार्थी प्रवास करत असताना ई-रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा कलंडली. या अपघातात एक विद्यार्थी जखमी झाला असून अन्य पाच विद्यार्थ्यांना किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात ई-रिक्षा चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
माथेरानमधील सेंट झेव्हिअर हायस्कुल शाळेतील विद्यार्थी पर्यावरणपूरक ई-रिक्षामधून शाळेसाठी ये-जा करीत असतात. गुरुवारी (दि. 25) आर्या वीरेंद्र कदम आणि इतर पाच मुले असे सेंट झेव्हिअर हायस्कूल माथेरान येथे पुस्तके आणण्याकरीता ई-रिक्षा स्टॅण्ड माथेरान येथून सतिश हणुमंत डोईफोडे यांच्या ई-रिक्षा क्र. एम.एच.46 बी.पी. 7334 या ई-रिक्षामधून प्रवास करीत होते. त्यावेळी ई-रिक्षाचालक यांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून प्रवासी वाहतूक केली आणि भरधाव वेगाने तसेच निष्काळजीपणाने वाहतूक करताना हयगय केल्याने ई-रिक्षावरील नियंत्रण सुटून लेक व्ह्यू हॉटेल येथे रिक्षा पलटली. त्यामुळे ई-रिक्षामधून प्रवास करणारे विद्यार्थी रिक्षाबाहेर फेकले जावून रस्त्यावर पडले. या अपघातात आर्या कदमच्या उजव्या हाताला दुखापत झाली तसेच सोबत असणा-या विद्यार्थ्यांनाही किरकोळ मार लागला.
अपघातानंतर तत्काळ सर्व विद्यार्थ्यांना माथेरान पालिकेच्या बी. जे. हॉस्पीटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद माथेरान पोलीस ठाण्यात केली असून तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.