दोषींना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी; महिलांनी सादर केले पोलिसांना निवेदन
| रसायनी | प्रतिनिधी |
उरणची यशश्री शिंदे व नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी रसायनीत सर्वपक्षीय, सामाजिक संघटना, महिला बचतगट एकत्र येऊन नवीन पोसरी हनुमान मंदीर ते मोहोपाडा असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा नवीन पोसरी बाजारपेठेतून मुख्य रस्त्याने मोहोपाडा प्रवेशव्दारातून मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतून शिवाजी चौकात नेण्यात आला.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे. यातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना शिक्षा देतो, अशी मागणी महिलांनी केली. यावेळी नको आम्हाला दीड हजार, महिलांना द्या सुरक्षेचा आधार या घोषणांनी परिसर दणाणला होता. महिला सुरक्षित नाहीत.त्यामुळे शासनाने कायदे कडक करणे गरजेचे आहे आणि अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या गुन्ह्यातील आरोपींना भर चौकात फाशी द्यायला हवी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यानंतर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. दोन्ही घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, असे निवेदन महिलांनी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर यांना दिले. या आक्रोश मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी, महिला बचत गट, सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदविला होता.







