| चणेरा | प्रतिनिधी |
उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्याकांडाने संबंध राज्य चांगले हादरले. शिंदे हिची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. घटनेची निंदा करावी तेवढे कमीच आहे. क्रूरकर्मा आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली. संबंधित आरोपीला भरचौकात फाशी द्या, असा आक्रोश चोहोबाजूने होत आहे. याच घटनेआधी ठाणेतील अक्षता म्हात्रे हिच्यावर चक्क मंदिरातील पुजाऱ्यांनी अतिप्रसंग करून हत्या केली. याही घटनेचा सर्वत्र निषेध होत असतानाच मंगळवारी रोहा शहरात निघालेल्या यशश्री शिंदे हिच्या हत्याच्या निषेधार्थ मूक मोर्चात मोठ्या संख्येने रोहेकर एकटवले. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
नराधमांना फाशी द्या असा संताप मोर्चेकरांनी व्यक्त केला. राम मारुती चौकातून निघालेल्या मूक मोर्च्याची सांगता तीन बत्ती नाका पोलीस चौकात झाली. यावेळी तहसीलदार किशोर देशमुख यांना मोर्चेकरांनी निवेदन देऊन सरकाराकडे फाशीच्या शिक्षेची मागणी केली. दरम्यान, नागोठणे, कोलाड यांसह सर्वत्र निघालेल्या मोर्च्यात भगिनी अक्षता म्हात्रे, यशश्री शिंदे यांच्या हत्येचा एकत्रित निषेध केला. जात-धर्म न पाहता नराधमांना फाशी द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. या निषेध मोर्चाला सबंध रोहेकरांनी मोठी गर्दी केल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.