शाळकरी मित्र मनोहर बैले यांनी उलगडला नाना पाटेकरांचा जिव्हाळ्याचा स्वभाव
| आगरदांडा | गणेश चोडणेकर |
पडद्यावर आपल्या अभिनयाने लाखो रसिकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा आणि संवादातून मनाचा ठाव घेणारा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मुरूडमध्ये पोहोचताच त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. नानांसोबत बालपण घालवलेल्या मित्रांच्या डोळ्यांसमोर त्यांचा साधा, मनमिळाऊ आणि तितकाच परखड स्वभाव पुन्हा उभा राहिला. शाळकरी मित्र मनोहर बैले यांनी नानांच्या अनेक आठवणी सांगताना भावुक होत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील माणूसपण उलगडले.
नाना पाटेकर आणि मनोहर बैले यांची मैत्री शालेय जीवनापासूनची. पुढे नाना चित्रपटसृष्टीत मोठे नाव झाले, देशभर प्रसिद्ध झाले; मात्र जुन्या मित्रांशी असलेला त्यांचा जिव्हाळा शेवटपर्यंत कायम राहिला. नानांचा स्वभाव खूप चांगला होता. मित्रांनी त्यांच्याशी ‘अहो-जाहो’ करून औपचारिकपणे बोललेलं त्यांना अजिबात आवडत नसे. मित्रांनी असा औपचारिक आदर केला तर त्यांना राग यायचा. मित्रांमध्ये ते अगदी आपुलकीने आणि सहजपणे वावरायचे, अशी आठवण मनोहर बैले यांनी सांगितली.
गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात नानांनी आपल्याला आवर्जून बोलावले होते, असेही बैले यांनी सांगितले. गणपतीला नानांनी मला बोलावलं होतं. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मनापासून आदरातिथ्य केलं. नाना मुरूडला आल्यानंतर माझ्या घरीही राहिले होते. त्यावेळी मी त्यांना पद्मदुर्ग किल्ला दाखवला होता, असे त्यांनी सांगितले. चित्रपटसृष्टीत यशाचे शिखर गाठल्यानंतरही नानांनी जुन्या मित्रांशी असलेले नाते कधीच विसरले नाही. प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा माणसांशी जोडलेली नाती जपणारा त्यांचा स्वभाव त्यांच्या मित्रांच्या आठवणींतून प्रकर्षाने जाणवतो. नानांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रासह त्यांच्या बालपणीच्या मित्रांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पडद्यावरचा महान अभिनेता हरपला असला, तरी मुरूडच्या गल्लीबोळात बालपण जगलेला त्यांचा ‘नाना’ मात्र मित्रांच्या आठवणीत कायम जिवंत राहणार आहे.





