| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील महिला अत्याचार निर्मूलन समिती यांच्या माध्यमातून नेरळमधील महिलांनी एकत्र येत मूक मोर्चा काढला. यावेळी असंख्य महिलांची उपस्थिती होती.
नेरळमधील महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महिला अत्याचार निर्मूलन समितीने उरण येथील यशश्री शिंदे आणि नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे यांच्या हत्येच्या निषेधार्थ नेरळ गावात मूक मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये नेरळ गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. मारुती मंदिर येथून निघालेला मोर्चा टिळक चौकातून हुतात्मा हिराजी पाटील चौक येथून माथेरान-नेरळ रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तेथून जुन्या बाजारपेठेमधून महावीर चौक असा पुन्हा मारुती मंदिर येथे पोहोचला. त्यावेळी महिला अत्याचार निर्मूलन समितीकडून नेरळ पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नरेश नांदगावकर, तसेच महिला पोलीस कर्मचारी यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनात 200 हून अधिक महिलांच्या सह्या होत्या.