दिल्लीवाऱ्यांचा हिशेब मांडत तटकरे आक्रमक
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिंदे गटाचे आ. महेंद्र दळवी यांच्या अकलेची आणि त्यांच्या आकलन शक्तीची कीव येते. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी खा. तटकरे यांची मदत घेतली. मात्र आज तेच तटकरे साहेबांवर टीका करीत आहेत. याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विधानसभेच्या निवडणूकीत मदतीसाठी किती वेळा तटकरे साहेबांकडे फेऱ्या मारल्या? काय काय केलं? हे सगळं माहित आहे. अलिकडेच जिल्हा परिषद निवडणूकीनंतर दळवींनी त्यांची पत्नी मानसी दळवी यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावे, यासाठी तटकरे साहेबांकडे दिल्लीवाऱ्या केल्या असल्याचे सांगत आ. अनिकेत तटकरे यांनी दळवींची पोलखोल केली.
राज्यात महायुती असली, तरी रायगड जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. पत्रकारांशी बोलताना महेंद्र दळवी यांनी, राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीला आम्ही गणतीत पकडत नाही. तसेच भाजप आणि आमचे विचार जुळतात, असे स्पष्ट करत रायगडमध्ये तिन्ही पक्षांच्या एकत्रित काम करण्याच्या मुद्द्यावरून जोरदार आगपाखड केली. तसेच आगामी काळात रायगड लोकसभेवर शिवसेनेचाच भगवा असेल असे सांगत तटकरे कुटुंबाला येणाऱ्या काळात मोठा झटका मिळेल, असे वक्तव्य केले होते. याचा खरपूस समाचार घेत आ. अनिकेत तटकरे यांनी दळवींच्या दिल्लीवाऱ्यांचा हिशेबच पत्रकारांसमोर मांडला.







