। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सलग दहाव्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची संपत्ती 7,18,000 कोटी रुपये आहे. दुसर्या स्थानावर अदानी समूहा चे उद्योगपती गौतम अदानी हे असून त्यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात दिवसाला एक हजार कोटी रुपये याप्रमाणे 3,65,700 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या काळात भारतात 179 नवे लोक अतिश्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झाले.
हुरुन इंडिया-आयआयएफएल च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार देशात एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेले 1007 लोक आहेत. त्यापैकी तेरा जणांची संपत्ती एक लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
अतिश्रीमंतांच्या अशा दहाव्या यादीत मुकेश अंबानी सलग दहाव्या वेळी अव्वल स्थानावर आहेत. त्यांच्या संपत्तीत 2020 पासून 9 टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर येणार्या अदानी यांची संपत्ती 1,40,000 कोटी रुपयांवरून 261 टक्के वाढून 5,05,900 कोटी रुपये झाली. त्यामुळे गौतम अदानी आशियातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. या यादीत तिसर्या स्थानावर 67 टक्के वृद्धीसह तसेच 2,36,600 कोटी रुपयांची संपत्ती असलेले शिव नाडर आणि एचसीएल परिवार आहे.