। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक जवळपास 120.97 चौरस किमी एवढे विस्तीर्ण कांदळवन क्षेत्र आहे. समृद्ध जैवविविधतेने बहरलेल्या या कांदळवनांमध्ये निसर्ग पर्यटनाला सर्वाधिक वाव आहे. यामुळे कांदळवन व तेथील बहुविध जैवविधतेचे संरक्षण आणि संवर्धन तर होईलच पण मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी नवा मार्ग खुला होणार आहे. त्यामुळेच कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजने अंतर्गत आणि कांदळवन प्रतिष्ठान निसर्ग पर्यटना अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे व दिवेआगर या गावांमध्ये कांदळवन निसर्ग पर्यटन हा जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
कांदळवन कक्ष रायगड व कांदळवन प्रतिष्ठान रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वनक्षेत्रपाल अधिकारी कांदळवन कक्ष अलिबाग-रायगड समीर शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीवर्धन मिलिंद राऊत, सहाय्यक संचालक निसर्ग पर्यटन वंदना झवेरी यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळवन निसर्ग पर्यटनाचा नुकताच आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने आगामी काही दिवसांत येथे कांदळवन निसर्ग पर्यटनास सुरुवात होईल. अशी माहिती वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी दिली.
वैशिष्ट्ये
कांदळवन निसर्ग पर्यटनामध्ये कांदळवनाची सफर, कांदळवन नौका स्वारी, निसर्ग भ्रमंती/पक्षी निरीक्षण, किनारा भ्रमंती आणि किनार्यांवरील खडक टाळ्यांमधील जैवविविधतेचे निरीक्षण, तार्यांचे निरीक्षण, पारंपरिक व आधुनिक मासेमारी, समुद्रातील जलचरांची माहिती, भ्रमंती/नौका स्वारी दरम्यान मत्स्यपालन प्रकल्प किंवा कांदळवन वृक्षारोपणाच्या स्थळांना भेट, आसपासच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, स्थानिक पाककृती आणि पारंपारिक जेवण आदी बाबींचा समावेश कांदळवन निसर्ग पर्यटनात पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
पर्यटन वृद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर
येथील कांदळवन निसर्ग पर्यटनाची माहिती जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत पोहोचावी व पर्यटनाला चालना मिळावी यासाठी काळींजे कांदळवन निसर्ग पर्यटन या नावाने नवीन फेसबुक वर इंस्टाग्राम पेज बनवण्यात आले आहे. असेच पेज दिवेआगर कांदळवन निसर्ग पर्यटनाचे देखील बनविण्यात येणार आहे.
स्थानिकांना प्रशिक्षण व सहाय्य
काळींजे व दिवेआगर या गावांमधील स्थानिक लोकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आणि क्षमता बांधणी उपक्रम राबवून तज्ज्ञांमार्फत कांदळवन निसर्ग पर्यटनातील विविध बाबींचे प्रशिक्षण दिले गेले आहे. यामध्ये कांदळ प्रजातींची ओळख, पक्षी प्रजातींची ओळख, पक्षी निरीक्षणाचे तंत्र, किनारी आणि सागरी जैवविविधतेची ओळख, निसर्ग पर्यटनाची संकल्पना व त्यामधील तत्वे, स्थानिक पदार्थाना अधिक बाजार योग्य बनवण्याचे प्रशिक्षण, तारका निरीक्षण आणि जीवरक्षण प्रशिक्षण इ. उपक्रमांचा समावेश आहे. कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटनाचा हा उपक्रम स्थानिक लोकांच्या उन्नतीसाठी आणि कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धनास प्रोत्साहित करण्यासाठी हाती घेतलेल्या समुदाय-आधारित संवर्धन कार्यक्रमाचा एक भाग आहे. सुरुवातीच्या तांत्रिक आणि आर्थिक पाठिंब्यानंतर, निसर्ग पर्यटनाच्या या प्रकल्पाचे नियोजन संपूर्णपणे स्थानिक समुदायाद्वारे करण्यात येणार आहे.
राखीव क्षेत्र
रायगड जिल्ह्यात 2,302.096 हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये श्रीवर्धन, म्हसळा, पेण, रोहा, मुरुड, महाड व तळा या तालुक्यांचा समावेश आहे.
कांदळवन निसर्ग पर्यटनासाठी आवश्यक असलेली कायाक, नौका, दुर्बीण आदी विविध साहित्य शासनाकडून 90 टक्के सबसिडीने देण्यात आले आहे. त्याबरोबरच प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील दिले जात आहे. या माध्यमातून आगामी काळात येथे हजारों लोकांना रोजगार निर्माण होईल. तसेच जगभरातील लोकांना येथील जैवविविधता व निसर्गाचा खजिना जवळून पाहता व अनुभवता येईल.
सिद्धेश कोसबे, अध्यक्ष दिवेआगर कांदळवन निसर्ग पर्यटन गट
हे प्राथमिक पथदर्शी प्रकल्प आहेत. भविष्यात जिल्ह्यातील आणखीन अश्या स्थळांची निवड करून प्रकल्प सुरू केले जातील. त्या अनुषंगाने पर्यटक वाढतील व किनारपट्टीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. आणि जैवविधतेचे व कंदळवनांचे संरक्षण व संवर्धन देखील होईल.
समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष अलिबाग-रायगड