। उरण । वार्ताहर ।
सध्या उरण पोलीस ठाण्याला हंगामी वरिष्ठ अधिकार्यांची वर्णी लागल्याचे दिसून येत आहे. कारण येथे येणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे अवघ्या तीन ते चार महिन्यांतच बदलून जात आहेत. यामुळे या पोलीस ठाण्याच्या खुर्चीला अस्थिरतेचा शाप लागल्याची चर्चा सध्या जनमानसात रंगू लागली आहे.
मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला उरण हा अडगळीत पडलेला तालुका असून या तालुक्यात विविध जाती धर्माचे लोक राहत आहेत. मात्र, वाढत्या औद्योगिकरण, नागरिकरणामुळे या तालुक्याचा समावेश हा नवीमुंबई आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. जून्या पोलीस ठाण्याच्या जागेतून या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे आपला कामकाज पाहत आहेत. मात्र, तालुक्यात आलेली सुबत्ता आणि जागेची कमतरता यामुळे उरण पोलीस ठाण्याच्या अधिकारी वर्गाने जून्या कार्यालयातील आपले दालन सोडून नव्याने उभारण्यात आलेल्या दालनातून आपला कारभार सांभाळण्यास सुरुवात केली आहे.
परंतु, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या सारखे कर्तव्य दक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे अवघ्या तीन ते चार महिन्यांतच बदलून जात आहेत. सध्या उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार जितेंद्र मिसाळ यांच्या हाती सर्पुद करण्यात आला आहे. यामुळे या पोलीस ठाण्याच्या खुर्चीला अस्थिरतेचा शाप लागल्याची चर्चा सध्या जनमानसात रंगू लागली आहे. एकंदरीत गुह विभागाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पोलीसामध्ये अस्थिरतेची भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.