| नेरळ | प्रतिनिधी |
बदलापूर येथील लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध कर्जत तालुक्यात करण्यात आला. कर्जत येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शहरातील लोकमान्य टिळक चौकात निदर्शने केली. आरपीआय आठवले गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांना निवेदन देवून आपला संताप व्यक्त केला.
राज्यात सुरु असलेले महिलांवरील अत्याचाराचे सत्र आणि बदलापूर येथील लहान मुलीवर अत्याचाराची घटना यामुळे मुंबई परिसर हादरला आहे. बदलापूर मधील शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बदलापूर पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बदलापुरातील आदर्श विद्यालय या शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. कर्जत तालुक्यातील आरपीआय आठवले गटाच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना निवेदन देण्यात आले. तसेच आरपीआय आठवले गटाचे वतीने कन्या शाळा कर्जत, अभिनव प्रशाळा तसेच कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आरपीआय आठवले गटाचे कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर, जिल्हा उपाध्यक्ष जयेश शिंदे, दिपक भालेराव, कर्जत विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड, कर्जत शहराध्यक्ष अरविंद मोरे, महिला शहराध्यक्ष वैशाली भोसले, सुमित सुर्वे, संतोष जाधव, दीपक गायकवाड, अशोक गायकवाड, रमेश जाधव, निलेश डोळस, साहिल मोरे उपस्थित होते.