। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईच्या वाशी खाडीतील जुहू गाव चौपाटीवर व्यवस्थित बांधलेली जेट्टी नसल्याने या ठिकाणी मच्छीमारांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने जेट्टी बांधावी, अशी मागणी होत आहे.
शेती आणि मासेमारी हा येथील भूमिपुत्रांचा महत्वाचा व्यवसाय आहे. मात्र, नवी मुंबई स्थापन झाल्यानंतर हळूहळू शेती व्यवसाय संपुष्टात आला असला तरीही शहरातील गावात असलेल्या जेट्टींवर मच्छीमारांचा व्यवसाय सुरू आहे. त्यातूनच स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतो. जुहू गावातील मच्छिमार वाशी खाडीत मासेमारी करत असून त्यांच्या होड्या जुहू चौपाटी किनारी लावल्या जातात. मात्र, जुहू गावातील चौपाटीवर अद्यापही सुसज्ज अशी जेट्टी, पिण्याचे पाणी आणि विद्युत रोषणाई नसल्याने मच्छीमारांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने सुसज्ज जेट्टी बांधण्याची मागणी येथील मच्छीमार करीत आहेत.