। पुणे । प्रतिनिधी ।
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तर कोकण आणि गोवा, मराठवाडयात तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. राज्यातील मोसमी पावसाचा अधिकृत हंगाम सप्टेंबर महिन्यात संपला आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात मोठया पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गुलाब चक्रीवादळाच्या अवशेषातून अरबी समुद्रात वायव्येला शाहीन चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. शाहीन चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पूर्वेकडून वाहणार्या वार्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम म्हणून राज्यात अनेक भागात सध्या पाऊस पडत आहे. गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तर कोकण आणि गोव्यासह मराठवाडयात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.