| अलिबाग | प्रतिनिधी |
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख 22 हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत. काही बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले; परंतु काहींना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. एक जूनपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. बंद असलेले खाते पूर्ववत चालू करण्यासाठी महिलांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. तसेच शाळा सोडल्याचा दाखलादेखील मिळविण्यासाठी शाळांमध्ये धावाधाव सुरु झाली होती. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु होती. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने अर्ज भरण्याचे काम करण्यात आले. शहरी भागात काही नगरपालिकांनी वायफायसेवा उपलब्ध करून या योजनेचे अर्ज भरून घेतले. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख 22 हजार महिलांनी अर्ज भरले आहेत. यातील काही महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. तर, काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. ऑगस्ट महिना संपला तरीदेखील पैसे जमा न झाल्याने काही महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे.
ई केवायसी करण्यासाठी बहिणींची गर्दी
जिल्ह्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने काही महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये याप्रमाणे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले. त्यांना मोबाईलवर मेसेज आला. परंतु, काही महिलांना ई केवायसी न केल्याचा फटका बसला आहे. पैसे काढण्यासाठी गेल्यावर ई केवायसी न केल्याने जमा झालेले पैसे मिळण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेक महिला ईकेवायसी करण्यासाठी बँकेत गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.