। माथेरान । वार्ताहर ।
पर्यटन क्रांती घडवून आणण्यासाठी ई-रिक्षा मैलाचा दगड ठरत असताना या सेवेचा लाभ अगोदर आम्हा पर्यटकांना देण्यात यावा, अशी मागणी खुद्द पर्यटकांकडून केली जात आहे.
मोटार वाहनाने दस्तुरीला आल्यावर ई-रिक्षाचा रेल्वे स्टेशनपर्यंत केवळ 35 रुपये माणसी दर आकारला जात असल्याने ह्या प्रवासासाठी पर्यटक आपल्या लहान मुलांना घेऊन रिक्षा स्टँडवर ताटकळत उभे असतात. अशावेळी स्थानिक लोकसुध्दा ई-रिक्षातून प्रवास करण्यासाठी गर्दी करत असून रिक्षा आल्या आल्या ताबडतोब रिक्षात बसण्याची घाई करत असतात. त्यामुळे ताटकळत उभे असणार्या पर्यटकांचा हिरमोड होताना दिसून येत आहे.
स्थानिक लोक ज्यावेळी रिक्षा स्टँडवर येतात. त्यावेळी त्यांनासुध्दा काही वेळ थांबविण्यासाठी संबंधित कर्मचारी वर्गाने सूचित करून अगोदर पर्यटकांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. ई-रिक्षाच्या समर्थकांनी ई-रिक्षा सुरू होण्यासाठी आपल्या परीने योगदान दिले असले तरी सुद्धा घाई न करता ज्या पर्यटकांमुळे आपल्या घरातील कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. पर्यटक आले तरच येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल याची जाणीव स्थानिकांनी ठेवल्यास ही सेवा सुरळीत कायमस्वरूपी चालू राहणार आहे. रिक्षा स्टँडवर स्थानिक लोकांच्या गर्दीत ज्यांनी ई-रिक्षाला विरोध दर्शविला आहे. अशीच मंडळी प्रामुख्याने ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठी उतावीळ असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
एक दिवसीय पर्यटनासाठी इथे आलो होतो. सोबत लहान लहान मुले आणि आईबाबा होते. जवळजवळ अर्ध्या तासाने आमचा ई-रिक्षासाठी नंबर आला. त्यासाठी संघटनेने योग्य नियोजन केल्यास सर्वांना या सेवेचा लाभ मिळू शकतो. गावकर्यांनी अगोदर येणार्या पर्यटकांना प्राधान्य दिल्यास कुणालाही ताटकळत उभे राहण्याची वेळ येणार नाही.
– नटेश्वर मांगले, पर्यटक, मुंबई