विधानसभा प्लॅनिंगच्या प्रत्येक बैठकीत मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी महत्त्वाचा निर्णय
। मुंबई । प्रतिनिधी ।
लोकसभा निवडणुकीत मुंबईत 3 पैकी 2 हातच्या जागा गमावल्यानंतर भाजपनं संघासमोर शरणागती पत्करली. येत्या निवडणुकीत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन देताना संघाने भाजपच्या प्रत्येक स्तरावर हस्तक्षेप करण्याची अट घातली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित असलेल्या विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम आणि अशा सर्व आघाड्या आता महायुतीच्या उमेदवारांसाठी छुप्या व उघड पद्धतीनं काम करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपेक्षित मदत न केल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला होता. मुंबईसह राज्यभरात याचा प्रभाव जाणवला होता. त्यामुळे भाजपच्या लोकसभेच्या जागांची संख्या 23 वरुन 9 पर्यंत खाली घसरली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्यांना सामील करुन घेतले जाईल.
विधानसभा निवडणुकीसाठी संघाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार आहे. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढेल, असे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. भाजपच्या विधानसभेपासून बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सामील होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचाराची भाजपची रणनीती निश्चित करण्यात संघाची भूमिका महत्त्वाची असेल.
लोकसभेला संघाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली होती. मात्र, आता संघ विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपसोबत मैदानात उतरणार आहे. मुंबईत यामिनी जाधव यांना दिलेल्या उमेदवारीमुळे संघात कमालीची नाराजी होती. लोकसभा निवडणुकीत संघाने याच नाराजीमुळे तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यानं महायुतीला मुंबईत अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. उमेदवार निवडीमध्ये संघ कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. मात्र, त्याचवेळी अजेंडा राबवताना कुठलीही तडजोड केली जाणार नाही, याचीही खात्री संघाने भाजपला दिल्याचे सूत्रांचं म्हणणं आहे.