। रायगड । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवावेळी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे मोठे-मोठे बॅनर लावेल जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता असते तसेच काही वेळा शुभेच्छांच्या बॅनरवर वादग्रस्त राजकीय टिका-टिप्पणी करणारा, चारित्र्य हनन करणारा मजकूर लिहीलेला असतो. त्यामुळे राजकीय मतभेद होऊन शांतता भंग होऊ शकते. अशा प्रकारचे बॅनर रस्त्यावर लावण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हा शांतता समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत जिल्हा शांतता समिती सदस्यांनी याबाबातची मागणी केली होती. त्याला आता जिल्हाधिकार्यांनी हिरवा कंदील दिला आहे. रायगड जिल्ह्यातील (मा.पोलीस आयुक्तालय नवी मुंबई कार्यक्षेत्र वगळून) सर्व क्षेत्रामध्ये गणेशोत्सव कालावधीमध्ये शुभेच्छांचे बॅनर लावल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात व कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये, म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिते अन्वये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मनाई आदेश लागू केला आहे.