| सारळ | वार्ताहर |
डाक विभागाने आता कार्यालयाच्या चौकटीत कामकाज करण्याच्या जुन्या पद्धतीला छेद देत जनतेमध्ये जाऊन काम कारण्याच्या नवीन पायंडाला सुरुवात केली आहे. डाक चौपाल या केंद्र सरकारच्या संकल्पास मूर्तरूप देताना रायगड डाक विभागाने जनता शिक्षण मंडळाच्या विद्यार्थी व कर्मचारीवर्गासाठी महाविद्यालयामध्येच विविध योजनांची माहिती देत जागेवरच आधार अपडेशन सेवा दिली.
याचा लाभ अनेक कर्मचारी व विद्यार्थीवर्गाने घेतला. याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, जेएसएम कॉलेजच्या प्रा. सोनाली पाटील, दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या प्रा. नीलम हजारे, डाक अधीक्षक सुनील थळकर, सहाय्यक डाक अधीक्षक विनोद मेदारे, आयपीपीबी मॅनेजर अमोल नीवाते आदी मान्यवर उपस्थित होते. अॅड. गौतम पाटील यांच्या विद्यार्थी व कर्मचारीवर्गाच्या हितास प्राधान्य देण्याच्या मानसिकतेमुळे विद्यार्थीवर्गाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करता आली तसेच इतर कॉलेज, शाळेतील विद्यार्थीवर्गाचे मोठ्या प्रमाणात आधार अपडेशन असल्यास डाक चौपालच्या माध्यमाद्वारे स्थानिक पातळीवर ही सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भावना याप्रसंगी डाक अधीक्षक सुनील थळकर यांनी व्यक्त केली.