वादाचे प्रसंग, कर्मचार्यांची दमछाक
| मुरूड शहर | वार्ताहर |
शासनाच्या लाडकी बहीण योजनेंतर्गत बँकांच्या खात्यामार्फत दीड हजार रुपये प्रतिमहिना महिलांना दिले जात असल्याने ते काढण्यासाठी सर्वत्र बँकांमध्ये महिलांची दररोज प्रचंड गर्दी होत आहे. या कामाची पूर्तता करण्यासाठी सरसावलेल्या कर्मचार्यांनादेखील तोंड देताना नाकी नऊ येत आहेत. यामुळे बँकेत कामाचा प्रचंड ताण वाढल्याने कर्मचार्यांची पुरती दमछाक होताना दिसून येत आहे. कर्मचार्यांना घरी जाण्यासाठी रोज रात्री नऊ वाजत असल्याची माहिती मिळाली.
खंडित होणारा वीजपुरवठा, नेटवर्क बंद पडणे, नेटवर्क स्लो होणे यामुळेदेखील यात भर पडत असून, ग्रामीण भागात याची अधिक झळ बसत आहे. बँकांतून मोठी गर्दी होत असून, बसायलाही जागा अपुरी पडत असल्याने महिलांचेदेखील उभे राहून पाय दुखत आहेत. अशा विचित्र परिस्थितीमुळे मुदत ठेवी ठेवणारे बँक ग्राहकदेखील आपले बँकिंग काम करण्यासाठी बँकेत येण्यास नाखूष दिसून येत आहेत. मुरूडमध्ये ग्राहकांच्या दुचाकी पार्क करण्यासाठी पार्किंग नसल्याने अनेकांना पोलिसांचा दंडदेखील भरावा लागत आहे.
अनेक महिलांची बँक खाती काहींना काही कारणाने बंद असल्याने सुरू करण्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागत असल्याने त्रास अधिक होत आहे. मात्र, नियमानुसार केवायसी आवश्यक असल्याने कागदपत्रे दिल्यानंतर खाते सुरू केले जात आहे. आधार कार्डदेखील लिंक नसल्यास पुन्हा अडचणी येत आहते. या सर्वांची पूर्तता करताना सामान्य खातेदारदेखील हैराण होताना दिसून येत आहेत.
आपल्या शेजारी राहणार्या महिलेला पैसे मिळाले, मला का नाही? या आणि अशा अन्य प्रश्नांवर बँकेत प्रकरणे हमरीतुमरीवर येत असून, महिलांना समजविताना कर्मचारीदेखील हैराण झाले आहेत. या योजनेचे पैसे घेण्यासाठी महिला भगिनी सकाळपासूनच बँकेपाशी हजर होत आहेत. काही बहिणींच्या खात्यात पैसे आले, मात्र खाते बंद असल्याने किंवा खात्यात कमीत कमी बॅलन्स नसल्याने सर्विस चार्जेस कापले जात असल्याने खात्यात आलेली रक्कम शिल्लक राहात नाही. त्यामुळे ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना कामाचा ताण प्रचंड वाढल्याने इतर ग्राहकांच्या डिपॉझिट, कर्ज, नेफ्ट, आर्टिजस आणि आवश्यक महत्त्वाच्या बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.