। नवीन पनवेल। वार्ताहर ।
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 27 वर्षीय तरुणाला लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी सुरज कांबळे आणि दत्ता कांबळे यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सचिन खंडागळे हा आकुर्ली ग्रामपंचायतजवळ राहत असून बुधवारी (दि. 11) तो रिक्षाने मित्र अंकुश व संजय हे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सेक्टर 17, नवीन पनवेल येथील सागर कांबळे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी सागरचा भाऊ सुरज आणि वडील दत्ता कांबळे यांचे एका व्यक्तीसोबत वाद सुरू होते. सचिन त्यांचे भांडण सोडवण्यास गेला असता सुरजने डोक्यात लोखंडी सळीने मारून दुखापत केली. त्यावेळी अंकुश आणि संजय हे त्यांना पकडण्यासाठी आले असता दत्ता कांबळे यांनी दोन्ही मित्रांना लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर जखमींना खांदा कॉलनीतील अष्टविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.