| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
मुरुड व मजगावमध्ये गणेश विसर्जन सोहळा साजरा झाला. विसर्जनाच्या दुसर्याच दिवशी सकाळी 223 प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वाहून आल्या. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे त्या गणेशमूर्तींचे 30 श्रीसदस्यांनी पुन्हा खोल समुद्रात नेऊन विसर्जन केले.
मुरुड तालुक्यात प्लास्टरच्या मूर्तीचे प्रमाण कमी झाले आहे. पण शाडूच्या मूर्तीपेक्षा त्या मूर्ती स्वस्त मिळतात म्हणून त्या अजून आणल्या जातात. खरे तर पर्यावरणाला घातक मूर्ती खरेदी करू नका याबाबत जनजागृती केली जाते, पण त्याचा वापर पूर्णपणे बंद होताना दिसत नाही. डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्य गेले अनेक वर्ष प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे काम करत आहेत. तसेच किनारे स्वच्छ करतात, पण जनजागृती होऊन मत परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यासाठी सुशिक्षित लोकांनी पुढे येऊन स्वतः शाडूच्या मूर्ती आणणे गरजेचे आहे.