बँक कर्मचारी गजाआड
| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमधील बँकेत कामाला असलेल्या 29 वर्षीय कर्मचार्याने बँकेतील 41 वर्षीय महिला अधिकार्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या कर्मचार्याविरुद्ध बलात्कारासह धमकी देणे, मारहाण करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
या प्रकरणातील 41 वर्षीय पीडित महिला पनवेलमधील बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर, तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपीदेखील त्याच बँकेमध्ये चालक म्हणून कामाला आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपी कर्मचार्याने या महिलेसोबत मैत्री करुन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. त्यावेळी आरोपीने पीडित महिलेसोबतचे व्हिडीओ आणि फोटो काढले होते. त्यानंतर त्याने पीडित महिलेचे त्याच्यासोबत असलेले व्हिडीओ आणि फोटो तिच्या घरच्यांना तसेच बँकेतील इतर कर्मचार्यांना दाखविण्याची धमकी देऊन तिच्यावर बँकेच्या दुसर्या मजल्यावरील स्टोअररुमध्ये तसेच पनवेलमधील त्याच्या घरी नेऊन अनेकवेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. दिवसेंदिवस सदर प्रकार असह्य झाल्याने पीडित महिलेने त्याला विरोध करण्यास सुरुवात केली असता, त्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर या महिलेने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.