शिबिराला दोनशेहून अधिक नागरिकांची उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा रायगड उत्तर (पुरुष व महिला विभाग) यांच्यावतीने शनिवारी (दि.14) व्यक्तिमत्व विकास धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल येथील भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्रामध्ये हे शिबीर घेण्यात आले. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेचे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिला विभागाच्या जिल्हा अध्यक्षा उषा कांबळे यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा गुजरात, राज्यस्थान, हरियाणाचे प्रभारी बी. एच. गायकवाड , महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे, कोषाध्यक्ष विजय कांबळे, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, सरचिटणीस चंदा कासले, कोषाध्यक्षा सुनंदा वाघमारे, संस्कार सचिव संपदा चव्हाण, संरक्षण सचिव रमा गांगुर्डे, जिल्हा, तालुका, शहर, वॉर्ड शाखेचे पुरुष व महिला पदाधिकारी, उपासक, उपासिका व समता सैनिक आदी उपस्थित होते.
धम्म प्रशिक्षण शिबिरात माणसाच्या जीवनात आपल्या विकासावर कसे पैलू पाडता येतील याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेणे, प्रोत्साहन देण्यास शिका, सर्वांना संघटीत ठेवा, ध्येयपूर्तीकडे नेणारे आणि नितिमत्ता जपणारे तसेच योग्य वेळी निर्णय घेणारे नेतृत्व असावे, नावाच्या आणि पदाच्या मागे धावू नका अशा विविध विषयावर बी. एच. गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगड जिल्हा महिला सरचिटणीस छाया गवई यांनी केले असून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.